गडावर किल्ल्याचे अवशेष फार काही नाहीत. काही बाजूची तटबंदी मात्र आजतागायत शाबूत आहे. गडाच्या मधोमध आल्यावर नंदी, पिंड आणि देवीची मूर्ती आहे. ह्या मंदिराच्या खालच्याच बाजूला एक टाकं आहे पण तिथे जाण्यासाठी थोडं पुढे जाऊन मग खाली उतरावं लागत. टाक बऱ्यापैकी मोठं आहे. गडाच्या शेवटी गेल्यावर एक बुरुज आपल्या नजरेत दिसून येतो. तो बुरुज अजूनही गडाची राखण करत उभा आहे. गडावर दोन चौथऱ्याचे अवशेष आहेत, पण ते कशा संदर्भात आहेत, ते कळले नाही.
गडावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य, पाहण्यासारख्या आहेत. कसाऱ्याहुन जवळच आसलेले विहिगाव तिथे असलेल्या अशोका धबधब्यामुळे प्रसिद्ध आहे. कसारा-खोडाळा मार्गावर विहिगावात प्रवेश करण्यापूर्वी डावीकडे एक जि.प विहीगाव-रेंज हि शाळा दिसते, त्यालाच लागून एक चांगला रस्ता वर असलेल्या पठारावर जातो. ह्याच मार्गे वर जाताना एक पायवाट डावीकडच्या टेकाडावर जाताना दिसते. हीच पायवाट थेट गडावर जाते. १० मिनिटातच आपण उध्वस्त तटबंदीतून गडावर प्रवेश करतो. माथ्यावर पोचल्या पोचल्या आपल्या दृष्टीत पडतो तो कसारा घाट आणि कसारा घाटाचे सौंदर्य वाढवणारा रेल्वे ट्रॅक चे भोगदे आणि आजूबाजूचा प्रदेश.
*एकीकडे लोक कलावंतीण,लिंगाणा, अमकु, सांधण, अंधरबन, कळसुबाई सारख्या ठिकाणी लोक गर्दी करतात आणि एकीकडे अश्या काही किल्ल्यांच्या आजूबाजूला पण कोण फिरकत देखील नाही. उंचीने कमी, काहीच पाहण्यासारखे नाही, वर जाऊन पाह्ण्य्सारखे काही नाही ..असे वाक्य जेव्हा कानी पडतात तेव्हा मनाला प्रश्न पडतो ….. नक्की दुर्गभ्रमनाची ह्यांची व्याख्या काय ?*
सदर फोटो ड्रोनच्या सहाय्याने सुबोध पाठारे यांनी टिपला आहे.
आडवाट करून एकदातरी पाहण्यासारखा हा गड, छोटा असला तरी तितकाच महत्वाचा.
चेतन र राजगुरू
दुर्गसखा